धाराशिव  (प्रतिनिधी) - येथील धाराशिव प्रशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी दि.३ जानेवारी रोजी करण्यात आली.

धाराशिव शहरातील धाराशिव प्रशालेत माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी गीत, नृत्य व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक पंडित जाधव हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक बालिका लोहार, मीरा पवार, शिवशाहीर अनिल माने, शिक्षिका जयश्री भोसले आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थिनींनी माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मासाहेब, झाशीची राणी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषा करून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्यावर आधारित एकांकिका सादर केली. तर यावेळी जर सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ? पायरी एक एक चढताना, लल्लाटी भंडार, नथ घडवली बाई सवडीने आदींसह विविध गाण्यांवर विद्यार्थिनींनी आपले नृत्य सादर केले. तसेच शिवशाहीर अनिल माने यांनी फुले यांच्या कार्यावर आपल्या पहाडी आवाजात व शैलीत पोवाडा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मुख्याध्यापक जाधव यांच्यासह विद्यार्थिनींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक व उपस्थितांचे आभार नंदकुमार रणदिवे यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक बाळासाहेब इसके, मदन गिरी, शिक्षिका सुवर्णा सोनवणे, दिपाली रोकडे, गौरी माने, जिनत पठाण आदींसह पालक महिला, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top