कळंब (प्रतिनिधी)- खामगाव-पंढरपूर महामार्गावर केज-कळंब दरम्यान मांजरा नदी पुलाजवळाचा एक किमी नादुरुस्त व अत्यंत खराब रस्ता आणि याच महामार्गावरील येरमाळा घाटाखालील असलेला 800 मीटर नादुरुस्त रस्ता तात्काळ मजबुती व डांबरीकरण करा या मागणीसाठी येत्या मंगळवार दि. 28 जानेवारी रोजी केज विकास संघर्ष समितीने या परिसरातील नागरिकांच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेली पाच वर्षांपासून वरील रस्त्याचा भाग नादुरुस्त व अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी व इतर अवजड वाहनधारकांना वाहने चालवणे अत्यंत त्रासाचे व धोकादायक बनले आहे. आजपर्यंत या रस्त्यावर असंख्य अपघात होऊन अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर चोऱ्या, लूटमार व इतर प्रकार घडत आहेत. रस्त्यावरील मोठे खड्डे, दगडगोटे व सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या रस्त्यावरील मांजरा नदी पुलाचे काम शासकीय दिरंगाई व इतर कारणाने दीर्घकाळ चालणारे आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण होणे गरजेचे आहे. भविष्यात पूलाचे काम पूर्ण झाले तरी अवजड वाहनधारकांना सध्याचा रस्ता सोयीचा व सुरक्षित असणार आहे त्यामुळे हा रस्ता सध्या तात्काळ मजबुतीकरण व डांबरीकरण होणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने यापूर्वी अनेक उपोषणे, घंटानाद व रास्ता रोको आंदोलने केलेली आहेत. यापूर्वी एमएसआरडीसीने तीन कोटींचा निधी मंजूर करून निविदा काढल्याचे समितीला कळवले होते. मात्र आता तीन महिने उलटूनही अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काम सुरू केले नसल्याने अखेर केज विकास संघर्ष समितीने या भागातील नागरिकांच्या सहभागाने येत्या मंगळवारी मांजरा नदी पुलावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक सामाजिक  कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे.

या निवेदनाच्या प्रती कळंबचे तहसीलदार, केजचे तहसीलदार, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ जालना-संभाजी नगर आणि कळंब व युसुफ वडगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर हनुमंत भोसले, नासेर मुंडे, संपत वाघमारे, शेषराव घोरपडे इत्यादींची नावे आहेत.

 
Top