धाराशिव (प्रतिनिधी)- हळदी-कुंकू हा उत्सव माता-भगिनींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शहरासह ग्रामीण भागातील महिलांमध्ये देखील एकता निर्माण व्हावी, गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा, त्यांच्यात विचारांची देवाण-घेवाण व्हावी व परस्परांमधील नात्यांचे बंध अधिक घट्ट व्हावे या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जि.प.माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वतीने दरवर्षी 'हळदी- कुंकू व तिळगूळ' कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यावर्षी देखील धाराशिव जिल्ह्यात खासकरून तुळजापूर मतदारसंघातील विविध गावांमध्ये मकर संक्रांती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील हजारो महिला एका ठिकाणी, एका छताखाली आल्या. महिलांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ इत्यादींचे आयोजन देखील या माध्यमातून करण्यात येते. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला पुढे येऊन आपल्या व गावातील सार्वजनिक समस्या किंवा विकास कामांबाबत सौ.अर्चनाताई पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अर्चनाताई पाटील आश्वासित केले.

अर्चनाताई पाटील यांनी या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधून केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यामाध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरणा अनेकांना मिळत आहे. ज्यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा या योजनांच्या अधिक माहितीसाठी प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे संपर्क करावा असे देखील आवाहन सौ.पाटील यांनी केले आहे. मनोरंजनाबरोबरच एकीकरण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचविणे हा व्यापक हेतू या कार्यक्रमांच्या आयोजनामागे असल्याचे त्यांनी सांगितले.  या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी, गावातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते तसेच महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top