धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने एक हजार 328 कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला होता. तो आराखडा आता अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार दोन हजार 100 कोटी रुपयांचा परिपूर्ण अंतिम विकास आराखडा राज्य शासनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. आता लवकरच या अंतिम विकास आरखड्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे करण्यासाठी आपण मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. जगभरातील भाविक तुळजापुरात यावे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारणाला बळकटी मिळावी व त्यातून हजारोंची रोजगार निर्मिती व्हावी हे त्यामागील उद्देश आहे.संकल्पित आराखड्याचे आपण दिनांक 31 मार्च 2023 रोजी जनतेसमोर सादरीकरण करून त्यांच्या हरकती व सूचना मागवल्या होत्या.आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत एक हजार 328 कोटींचा निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आपल्या महायुती सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर 28 जुलै 2024 रोजी परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी संकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सहभागी झालेल्या विविध वास्तुविशारद कंपन्यांनी अधिक परिपूर्ण असे सादरीकरण केले. त्यातून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आलेल्या संकल्पनेचा अंतिम आराखड्यात समावेश करण्यात आला असल्याचे चित्र आमदार पाटील यांनी सांगितले.

तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जांचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी सर्वसमावेशक प्रक्रियेचा अंगीकार करण्यात आला आहे. 20 जून 2024 रोजी या आराखड्याचे पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर 15 जुलै 2024 रोजी आराखड्याची इत्यंभूत माहिती मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. शहर आणि परिसरातील नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून घेण्यात आल्या. नागरिकांच्या सूचना, आक्षेप जाणून घेण्यासाठी 20 जुलै रोजी आपण स्वतः शहरवासीयांसोवत बैठक घेतली. आलेल्या सूचनांवर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची समिती स्थापन केली. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सूचनांचा आरखड्यात नव्याने अंतर्भाव करण्यात आला त्यामुळे प्रस्तावित आरखड्याची प्रकल्प किंमत रु.1328 कोटींवरून रु.2100 कोटी एवढी झाली असल्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले .


भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा

तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात तब्बल 500 कोटी रुपयांची तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, तसेच जमिनीचा चांगला मोबदला देऊन आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


दर्शन मंडपात विविध सुविधा

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा, घाटशिळ व हडको येथे भाविक सुविधा केंद्र, शहरात व शहराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रवेशद्वारावर आकर्षक कमान, वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विकासकामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. भूसंपादन व शासकीय करापोटी आवश्यक असणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधी असा एकूण दोन हजार शंभर कोटी रुपयांचा अंतिम आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.


 
Top