कळंब (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील बावी शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीची घटना घडली. या घटनेत तिघांचा बळी गेला. ही घटना येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बावी शिवारात घडली. आज दिवसभर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया येरमाळा पोलिस ठाण्यात चालू होती.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शेतातील पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्याच्या कारणावरून दि.5 जानेवारी रोजी रात्री उशिरा वाद सुरू झाला होता. वादाचे रूपांतर भीषण हाणामारी झाली. दगड गोटे आणि लाठी काठी यांनी झालेल्या हाणामारीत रात्री तीन जणांचा जीव गेला. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद दोन गटात तुंबळ हाणामारी पर्यंत पोहोचला. दोन्ही बाजूने एकमेकावर दगडफेक करण्यात आली यामध्ये सुनील काळे आप्पा काळे व वैजनाथ काळे या तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यातील एकाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. घटनाची माहिती कळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ भेट दिली. सदर घटनेचे गांर्भिय पाहता पोलिस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, एलसीबीचे वासुदेव मोरे आदींनी भेट दिली. पुढील होणाऱ्या घटनेस पाय बंद घातला. घटनेचा पंचनामा करून संशयित पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. वाद नेमका कशामुळे झाला याचा पोलीस पुढील तपास करत आहेत. या संदर्भातील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया येरमाळा पोलिस ठाण्यात दिवसभर चालू होती.