कळंब (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जाते. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी ना प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत असल्याने व्यापारी मात्र मालामाल होत असून शेतकरी मात्र कंगाल होत असल्याने शेतकऱ्यातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्यापाऱ्यावर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्याने चक्क 26 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशाराच प्रशासनाला दिला आहे. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिकृत असे की, कळंबच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांदळवाडी येथील रमेश पवार या शेतकऱ्याने सॅम्पल घेऊन अनेक व्यापाऱ्यांना ते दाखवले. मार्केट यार्ड मधील एका व्यापाऱ्याने सदरील सॅम्पल पाहून सात हजार पाचशे रुपये भाव ठरवून माल आणण्यास सांगितले. त्यानंतर सदर शेतकऱ्यांनी गाडी भरून माल संबंधिताच्या आडत दुकानात विक्रीसाठी ठेवला. माल विक्री केल्यानंतर सदरील दुकानदाराने रमेश पवार यांना 7500 ऐवजी 7250 प्रति क्विंटल हातावर टेकवल्याने पवार यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडे धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पण संबंधित तक्रारीवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यातच रमेश पवार यांनी आपण 26 जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आमरण उपोषण करणार आहोत असा इशाराही लेखी पत्राद्वारे दिला आहे. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन या आडत व्यापाऱ्यावर काही कारवाई करणार का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन प्रत्येक शेतकऱ्याला मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते. अनेक वेळा सांगितले जाते की साहेब आले नाहीत, साहेब रजेवर आहेत, साहेब आजारी आहेत ? तुम्ही सभापती किंवा उपसभापती यांनाच भेटून तुमचे प्रश्न मांडा ! असा मार्मिक सल्ला देऊन शेतकऱ्याची बोळवण केली जाते. यामुळे शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती यांनी याकडे तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.