धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मध्ये अधिस्वीकृती धारक पत्रकारांना सर्वच बसेस मध्ये प्रवास सवलत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी, राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये अधिस्वीकृती धारक पत्रकारांना बस प्रवासात येणाऱ्या अडचणी मांडल्या. एसटी महामंडळाच्या साध्या निम आराम आणि शिवशाही या तीन प्रकारच्या बसमधून पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. मात्र मागील दोन वर्षांमध्ये एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या बस दाखल झालेल्या आहेत आणि लांब पल्ल्याच्या मार्गावर या नवीन बस सोडल्या जात आहेत. यामध्ये शयन आसनी (साधी स्लीपर), हिरकणी स्लीपर तसेच शिवाई, शिवनेरी आधी बसेसचा समावेश आहे. या प्रकारच्या बसेस मध्ये पत्रकारांना प्रवास सवलत सुविधा दिली जात नाही आणि याच बस गाड्यांची संख्या सर्वत्र आहे.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही ही सवलत सरसकट सर्व बस गाड्यांमधून लागू करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जेष्ठ पत्रकार दत्तात्रय उर्फ राजा वैद्य, शीला उंबरे,धनंजय रणदिवे,मल्लिकार्जुन सोनवणे, संतोष हंबीरे, भीमाशंकर वाघमारे,जी.बी. राजपूत,बिभीषण लोकरे, मच्छिंद्र कदम,राजेंद्र जाधव,किशोर माळी, सज्जन यादव उपेंद्र कटके,पांडुरंग मते, आकाश नरोटे,प्रशांत कावरे, किरण कांबळे,रहीम शेख, बाबासाहेब अंधारे,प्रमोद राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.