उमरगा (प्रतिनिधी)- डिग्गीकरांचा माझ्यावर हक्क असुन त्यांची प्रत्येक अपेक्षा पुर्ण करणे माझे कर्तव्य आहे. मतदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास विकासकामाच्या जोरावर सार्थ ठरवेन असे मत नुतन आमदार प्रविण स्वामी यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल तालुक्यातील डिग्गी येथे नुतन आमदार प्रवीण स्वामी यांचा पुणेकर ग्रुप व डिग्गी ग्रामस्थांच्या वतीने बुलढाणा येथील ह.भ.प. पुरुषोतम पाटील महाराज यांच्याहस्ते नागरी सत्कार संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील अध्यक्षस्थानी होते. रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, माजी आरोग्य उपसंचालक मुकुंद डिग्गीकर, विजेता ॲकॅडमीचे सतीष जाधव, महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर, जगदीश सुरवसे, सरपंच आशाताई लिंबारे, उपसरपंच संतोष कवठे उपस्थित होते. आमदार स्वामी यांचा ग्रामपंचायत डिग्गी, विविध कार्यकारी सोसायटी, वापी ग्रुप, पुणेकर ग्रुप, सुभाष कांबळे मित्रमंडळ, अमित हेबळे मित्रमंडळ आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अंकीता शिवानंद पाटील हिने विधीज्ञ परिक्षेत उत्तम यश संपादन केल्याने तीचा आमदार स्वामी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष सचिन हेबळे, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, माजी सरपंच सिद्धाराम कवठे, वामन गायकवाड, प्रा. युसुफ मुल्ला आदींनी यासाठी पुढाकार घेतला. ॲड. एस.पी. इनामदार यांनी सुत्रसंचलन केले. सतीष बालकुंदे यांनी आभार मानले.