धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील व्यापाऱ्यांना शांतता कमिटीमध्ये सहभागी करुन घ्यावे, तसेच ‘एक कॅमेरा नागरिकांच्या सुरक्षेसाठी' अभियानांतर्गत सर्व व्यापारी आपापल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली. यावेळी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र उपस्थित होते.
धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच एक बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासमवेत झाली. या बैठकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. या सूचनेचे व्यापारी महासंघाने स्वागत करुन लवकरच सर्व व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपापल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आश्वासन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी दिले.
जिल्ह्यात जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्याला आळा बसविण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांची होणारी लूट थांबविली होती. असेही जाधव यांनी सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव महेश वडगावकर, संघटन सचिव अभिलाष लोमटे, व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष नितीन फंड, अजहर खान, श्याम बजाज, सुभाष शेट्टी, बापू सूर्यवंशी, संपतराव डोके, कपील शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.