धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्ष नेते झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक व राजकीय योगदान अमूल्य आहे. आजच्या पक्ष बदलू राजकारणाकडे पाहता विरोधी पक्ष नेता असताना त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी आली असतानाही जीवनभर शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही. तत्वनिष्ठ राजकारण केले. भाई उद्धवराव पाटील यांचा सामाजिक वारसा जपावा. असे आवाहन राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे यांनी केले.
भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात घोगरे या बोलत होत्या. सदर कार्यक्रमास राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, संस्था सदस्य श्रीमती निर्मलाताई भांगे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ॲड.पांडुरंग लोमटे, प्राचार्य बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे, उपप्राचार्य व्हि. के. देशमुख, पर्यवेक्षक अमोल दिक्षित उपस्थित होते. सदर जयंती निमित्त प्रशालेमध्ये क्रीडा, निबंध व इतर स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. हुतात्मा दिन निमित्त मौन पाळत शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. सुत्रसंचालन एस. डी. जाधव यांनी केले. आभार आनंद वीर यांनी मानले. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.