धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी शाळेतील नवोपक्रमशील शिक्षक गोविंद घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध नवोपक्रम घेतले जातात . यावर्षी केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय लातुर विभागाच्या वतीने विभागस्तरीय उल्लास मेळावा लातुर येथे संपन्न झाला. 

चला साक्षरतेची पेटवू मशाल ! या ब्रीद वाक्यानुरूप विभागीय उल्लास मेळाव्यात लातुर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांतील अव्वल शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला . सर्व विभागातील शाळेनी विषयानुरूप सादरीकरण केले . विभागस्तरीय उल्लास मेळाव्यात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करताना लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी शाळेने मनोरंजक खेळ व गाणी हा नवोपक्रम दर्जेदारपणे सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये  कृतीयुक्त पाढे तयार करणे, स्वच्छता गीत, कृतीयुक्त कविता, लोकगीत यांचे साभिनयपणे सादरीकरण व गायन करत साक्षरता संदेश दिला . उपरोक्त गीतांना उपस्थित परीक्षक, अधिकारी व गुरुजानांनी टाळ्या वाजवत दाद दिली . जिल्हा परिषद रुद्रवाडी शाळेचा विभागस्तरावर शैक्षणिक व सांस्कृतिक  संदेशयुक्त साक्षरता दबदबा निर्माण झाला . विभागस्तरीय उल्लास मेळाव्यात उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन शाळेचे मुख्याध्यापक गोविंद घारगे व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ . गणपत मोरे, लातुर जिल्हा शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, धाराशिवचे शिक्षण विस्ताराधिकारी  भरत देवगुडे व काळे साहेब उपस्थित होते . शाळेचा नवोपक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी शितल खिंडे मॅडम, गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाणसाहेब, आष्टा बीटचे विस्ताराधिकारी मुळजे साहेबांचे मार्गदर्शन लाभले . तर नवोपक्रम संकल्पना व सादरीकरण करण्यासाठी केंद्रप्रमुख जीवन गायकवाड , साधनव्यक्ती हनुमंत दुधभाते, सहशिक्षिक निर्मला झुंजारे यांनी परिश्रम घेतले . या विभागस्तरीय उल्लास मेळाव्यातील यशाबद्दल ग्रामपंचायत कार्यालय, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व पालक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तीमत्वांनी शाळेचे कौतुक केले . विद्यार्थ्यांचे गुणवत्तापुर्ण शिक्षण, शिस्त व दर्जेदार नवोपक्रमातील यशस्वीतेबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आनंद साजरा केला.

 
Top