धाराशिव (प्रतिनिधी)- उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हले यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याच्या आरोप तहसीलदार मृणाल जाधव यांनी केला होता. आत हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विशाखा समितीकडे चौकशीसाठी पाठविले आहे.
येत्या 3- 4 दिवसात विशाखा समिती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करेल. त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. जिल्ह्यातील तहसीलदार व कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देते काम बंद आंदोलन मंगळवार दि. 31 डिसेंबरपासून सुरू केले आहे. तहसीलदार व कर्मचारी यांच्या म्हणण्यानुसार दप्तर तपासणी व इतर बाबींना कोणताही विरोध नाही. ती प्रशासकीय बाब आहे. मात्र ज्या पध्दतीने डव्हले यांनी अपमानास्पद वागणूक दिली त्याला विरोध आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिली. तर तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयात जावून दप्तर तपासणी करण्यात आली होती. त्यात कोणतेही चुकीचे केले नाही. वस्तूस्थितीत जी असेल तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. असे डव्हले यांचे म्हणणे आहे.