भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग मार्फत अमृत योजना -2 अभियाना अंतर्गत भूम शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बेचाळीस कोटी चाळीस लक्ष एकोनेंशी हजार तीनशे रुपये खर्च करुन पाईप लाईनचे काम सुरू झाले आहे. अजूनही स्टोरेज टँक साठी नगर परिषदेने जागा ताब्यात घेतली नसताना मात्र काम करण्याची घाई सुरू झाली आहे. यात शहरातील सर्व भागात गेल्या वर्ष भरापूर्वी झालेले सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक फोडण्यात आले आहेत. भूम नगर परिषद मध्ये सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक निकृष्ट करुन त्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना केलेली असताना चौकशी होण्या अगोदर रस्ते फोडल्यामुळे यात चौकशी होऊ नये असा डाव असल्याची शँका व्यक्त असल्याचे सांगितले.सदरील योजनेची कोणीही मागणी केलेली नसताना व शहराला वंजरवाडी व बाणगंगा तळ्यातून मुबलक पाणी पुरवठा होत असताना मात्र केवळ मुख्याधिकारी व प्रशासक यांनी नागरिकांशी कोणतीही चर्चा न करता केवळ कंत्राटदार यांच्याशी संगणमत करुन ही योजना नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप केले आहे. या अगोदर 2008 साली वाढीव पाईप लाईनचे काम झाले असताना आणी त्याची क्षमता 30 वर्षा पेक्षा जास्त असताना नवीन योजनेची काय गरज पडली असा सवाल विचारण्यात आला. अगोदरच भूम नगर परिषदेने घर पट्टी नळ पट्टी वर 2% व्याज लावून नागरिकांना वेठीस धरले आहे त्यात आता अमृत योजने अंतर्गत नळाला मीटर लावण्यात येणार असुन त्यामुळे नागरिकांना कीती कर आकारला जाईल याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत. सर्व प्रभागात योजनेचा नागरिक विरोध करत असुनही प्रशासक मात्र योजना करण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. येत्या 25 जानेवारी रोजी अमृत योजनेचे काम बंद करा यासाठी सर्वपक्षीय आमरण उपोषणास बसणार होते त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात उपोषण स्थगित करुन एक मोठे आंदोलन व संभाजीनगर खंडपिठात याचिका नागरिकांच्या वतीने दाखल करण्यात येणार असल्याचे सर्व पक्षीयांच्या वतीने सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस काँग्रेस तालुकाध्यक्ष माजी नगर सेवक रुपेश आप्पा शेंडगे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे, युवा नेते आबासाहेब मस्कर, माजी नगर सेवक, भाजप तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, काँग्रेस सेवादल जिल्हाउपाध्यक्ष विलास शाळू, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, पँथर सेनेचे चंद्रमणी गायकवाड, मनसे तालुका प्रमुख निलेश शेळके, आखिल भारतीय वडार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पवार आदी उपस्थित होते.