धाराशिव (प्रतिनिधी)- मागील सतरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदा या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे (आयुर्वेदाचार्या व पंचकर्म तज्ञ) यांची तर कार्याध्यक्षपदी विष्णु यमपुरे यांची निवड करण्यात आली.
जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी 12 जानेवारीपासून समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. राजमाता जिजाऊ पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहु समाजभूषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडाभुषण पुरस्कार, कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार. मान्यवरांची व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन, स्त्री रुग्णालय येथे विविध साहित्य वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर देखील या निमित्ताने आयोजित केले जाते. यावर्षी देखील समितीच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.