धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसेवा समिती धाराशिवच्या वतीने भारतरत्न स्व. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्थाना दिनांक 25 डिंसेबर रोजी मराठवाडा पातळीवरील “ लोकसेवा पुरस्कार “ दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचे मानकरी सर्वश्री गोवर्धन दराडे (ढेकणमोहा जि.बीड) पसायदान सेवा प्रकल्प, रामकिसन सोळंके (लिखितपिंपरी जि. जालना) प्रेरणादायी शिक्षण संकुल, सौ. मिराताई मोटे (नळदुर्ग जि.धाराशिव ) पालवरची शाळा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. मिलींद पाटील अध्यक्ष, लोकसेवा पुरस्कार संयोजन समिती, धाराशिव हे उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम खा. प्रमोद महाजन बहुउद्देशीय सभागृह, आर्य चाणक्य विद्यालय परिसर, धाराशिव येथे बुधवार दि. 25 डिंसेबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकसेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव कमलाकर पाटील व सदस्य शेषाद्री डांगे यांनी केले आहे.