धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील पाचव्या टप्प्याचे काम अंतिम होत आले आहे. यावर्षी झालेला अधिकचा पाऊस, भूसंपादन प्रक्रियेत जाणीवपूर्वक आणलेले अडथळे व वीज वाहक तारेच्या चोरीमुळे डिसेंबर अखेरीस अपेक्षित असलेली पंपगृहाची चाचणी आता जानेवारीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सिंदफळ तलावातील पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी रामदरा तलावात पुढील महिन्यात दाखल होणार आहे. या कार्यक्रमासह अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या योजनेच्या पाहणी व आढावा बैठकीसाठी वेळ देण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

बुधवार 25 डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र.2 अंतर्गत एकूण 5 पंपगृह आहेत. यापैकी टप्पा क्र. 2, 3 व 5 मधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा क्र. 1 व 4 मधील ही 75 टक्क्यांहुन अधिक कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने टप्पा क्र.1 व 4 मधील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकामाबाबत जिल्हाधिकारी पंधरा दिवसाला आढावा घेणार, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.

सदरील बैठकीस अधीक्षक अभियंता वि. ब. थोरात, कृष्णा मराठवाडा बांधकामचे कार्यकारी अभियंता अ. आ. नाईक, सोलापूर यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यु. ई. पेरंपल्ली, उपअभियंता रणदिवे, छत्रपती संभाजी नगर येथील गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाचे उपअभियंता तांडारे, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाच्या टप्पा क्र. 5 चे सहाय्यक अभियंता यो. सु. घुले, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग तुळजापूरचे उपअभियंता पी. यु. मंगरुळे, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग धाराशिवचे उपविभागीय अधिकारी व्ही. एस. पाटील यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 
Top