धाराशिव (प्रतिनिधी)- तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करण्यात येईल, अशी धमकी माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याला पत्राद्वारे देण्यात आली आहे. या आशयाचे पत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हातात कोंबले. नंतर दुचाकीस्वार पळून गेले. हा प्रकार रविवार दि. 22 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला. ढोकी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
ढोकी येथील तेरणा साखर कारखाना भैरवनाथ शुगरने भाडे कराराने घेतला. या कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत आहेत. ते प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. रविवारी दि. 22 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊस घेवून कारखान्याकडे येत होता. तेव्हा तेर-ढोकी रस्त्यावर मुळेवाडी पाटीनजीक ट्रॅक्टर चालकास दुचाकीवर आलेल्या दोघांनी अडवून बंद पाकिट दिले. ट्रॅक्टर चालकाने कारखान्यात आल्यानंतर सुरक्षा रक्षक संजय निंबाळकर व सुनिल लंगडे यांना सुपूर्द केले. रात्री उशिरा बंदिस्त पाकिट आल्यामुळे लंगडे यांनी कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांना फोन करून कल्पना दिली. त्यानंतर पुंड यांनी कारखान्यात येवून पाकिट उघडून बघितले. त्यात शंभर रूपयांच्या नोटेसोबत चिठ्ठीत माजी मंत्री सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम सावंत यांच्या नामोल्लेख करत तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करू, अशी धमकी होती. घटनेनंतर शेतकी अधिकारी पुंड, लंगडे, निंबाळकर यांनी ढोकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनोळखी आरोपीविरोधात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.