धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्रीय युवा महोत्सवात लोककला गटात विजेतेपद पटकाविणा-या संघास रंगकर्मी डॉ.संजय नवले स्मृति चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.  चोराखळी (ता.वाशी) येथील नवले कुटूंबियांच्यावतीने यंदाच्या महोत्सवापासूनच याची सुरुवात करण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागात प्राध्यापक विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ.संजय माणिकराव नवले यांचे कोरोना काळात अकस्मित निधन झाले. त्यांचे साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे सलग तीन टर्म संचालक, विद्यार्थी कल्याण विभागात 13 वर्षे सल्लागार समिती सदस्य सदस्य म्हणूनही योगदान दिले आहे तसेच आपल्या विद्यापीठाच्या युवा महोत्सवातही आठ वर्षे त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्या स्मृतीपित्यर्थ युवा महोत्सवातील 'लोककला' या कला प्रकारासाठी 'फिरता चषक' ठेवण्याची परवानगी द्यावी अशी नवले कुटूंबीयांची ईच्छा होती. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली 07 ऑगस्ट 2023 रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. कुलगुरु, व्यवस्थापन परिषद विद्यापीठ प्रशासनाचे नवले कुटूंबियांच्यावतीने आभार मानण्यात आले. कुटूंबियांच्यावतीने कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची सोमवारी (दि.23) भेट देऊन हा चषक सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी अधिसभा सदस्य प्रा.संभाजी भोसले, डॉ.अरविंद नवले, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. 25 ते 28 डिसेंबर दरम्यान यंदाच्या युवक महोत्सव होत आहे. समारोपप्रसंगी लोककला गटात विजेतेपद पटकाविणा-या संघास डॉ.संजय नवले स्मृति चषक ही फिरती ढाल प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पोवाडा, भारुड, वासुदेव गोंधळ, भजन, लोकगीतांचा समावेश आहे. नाटय महोत्सवात सध्या जगन्नाथ शंकर नाडापुडे स्मृति चषक देण्यात येत आहे.


 
Top