धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे गेल्या 20 वर्षां पासुन साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने अनेक साहित्यिक उपक्रम राबविले असून अक्षरवेल साहित्य मंडळाची दिनदर्शिका हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. दरवर्षी विविध नात्यावर आधारित कवितांचा सहभाग असलेली दिनदर्शिका यावेळी  बहीण या विषयावर आधारित असून यंदा सलग  सातव्या (7) अंकुर दिनदर्शिकेचे प्रकाशन मुक्तांगण शाळा, समता नगर येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण युवा कवयित्री पुरस्कार मिळालेल्या प्रसिद्ध कवयित्री पूजा भडांगे उपस्थित होत्या. कवयित्री पूजा भडांगे यांनी मी मुळची बेळगावची असले तरी धाराशिवची सुन आहे व इथे अक्षरवेल मंडळ साहित्य विषयक जे विविध उपक्रम राबवत आहे. ते काम खूप प्रशंसनीय आहे, असे मत व्यक्त केले. तसेच आपल्या अतिशय दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अक्षरवेल अध्यक्षा डॉ. सुलभा देशमुख यांनी ही दिनदर्शिका विविध नात्यांचे बंध दृढ करणारी आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात अक्षरवेलच्या मार्गदर्शिका डॉ. अनार साळुंके, कार्याध्यक्ष कमल नलावडे, उपाध्यक्ष स्नेहलता झरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री फुटाणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मंडळाच्या सचिवअपर्णा चौधरी यांनी करून दिला, आभार प्रदर्शन सारिका उमरकर यांनी केले. स्वागत गीत मोक्षा करवर यांनी सादर केले. या दिनदर्शिकेत कमल नलावडे, डॉ. अनार साळुंके, विमल नवाडे, किरण देशमाने, प्रा . विद्या देशमुख, ज्योती कावरे, शारदा मेहेत्रे, लता वाघचौरे, सारिका उमरकर, मनिषा पुंड / पर्वत, नेहा महाजन, डॉ. रेखा ढगे यांच्या कविता आहेत. या दिनदर्शिकेचे मुद्रण व सजावट अपूर्वाई प्रकाशनचे डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी केले.


 
Top