धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात नव्याने होत असलेल्या धाराशिव - तुळजापूर - सोलापूर या रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन सक्तीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अन्य नवीन रेल्वेमार्गासाठी मात्र, वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धत अवलंबून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. केवळ याच रेल्वेमार्गाच्या बाबतीत रेल्वे विभागाने भेदभाव केला आहे. धाराशिव हा आकांक्षित जिल्ह्यात येतो व सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख आहे. या स्थितीत रेल्वेने भेदभाव दूर करून थेट खरेदी पद्धतीने पाचपटीने शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत रेल्वे संशोधन विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खासदार राजेनिंबाळकर यांनी मराठीतून ही मागणी करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले. धाराशिव - तुळजापूर - सोलापूर नवीन रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरु आहे. या नवीन रेल्वेमार्गाची घोषणा झाली तेव्हा रेल्वेमार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीने संपादन न करता वाटाघाटीने व थेट खरेदीने करण्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने 2022 मध्ये काय बदल झाला माहित नाही. थेट खरेदी पद्धत बाजूला ठेवून सक्तीने भुसंपादन करून रेल्वेमार्गाच्या कामाला सुरवात करण्यात आली. थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन झाले असते तर शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला मिळाला असता. मात्र, दुर्देवाने सक्तीच्या भूसंपादनामुळे चार पटीने मोबादला मिळत असून तोही बाजारमुल्य तक्ता (रेडी रेकनर) दराने म्हणजेच शासकीय बाजारभावाने मिळत आहे. महाराष्ट्रातील नवीन रेल्वेमार्गासाठी थेट खरेदीच्या व शेतकऱ्यांसोबत वाटाघाटीची पद्धत अवलंबण्यात आली. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संपादनाच्या बाबतीत झालेला भेदभाव अन्यायकारक असल्याचे त्यांनी लक्षात आणून देत शेतकऱ्यांना पाच पटीने भूसंपादनाचा मावेजा देऊन अन्याय दूर करावा, अशी मागणीही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

 
Top