धाराशिव- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याच्या दहशतीने शेतकरी, नागरिक धास्तावले असताना आता वाघ देखील आढळला आहे. धाराशिव तालुक्यात गेल्या चार दिवसापासून बिबट्याने वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका गायीचा बळी गेला असून, एक गाय गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून 15 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. यातील एका कॅमेऱ्यात शुक्रवारी रात्री वन विभागाला वाघ दिसून आला. जिल्ह्यात प्रथमच वाघ दिसल्यामुळे वन विभाग देखील चक्रावून गेले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात एकदाही वाघ आढळलेला नव्हता.


शुक्रवारी रात्री धाराशिव तालुक्यात लावलेल्या एका ट्रॅप कॅमेरात हा वाघ दिसला. हा वाघ अडीच ते तीन वर्षाचा नर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. मागील चार दिवसात धाराशिव तालुक्यात पाळीव प्राण्यांवर जे हल्ले झाले ते हल्ले देखील या वाघानेच केले असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.


 
Top