धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी
धाराशिव - ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणातील 2 लाख 39 हजार 998 रुपयांची रक्कम संबंधित फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डवर ऑफर देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उमरगा येथील प्रतीक्षा माने यांना त्यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी इसमाने फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डवर ऑफर ॲक्टीवेट करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगून तीनवेळा ओटीपी घेतला. त्यावेळी तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डवर अनुक्रमे 99,999 रुपये, 99,999 व 40,000 रुपये असे तीन ट्रान्झक्शन झाल्याचे मेसेज आले. तक्रारदार यांनी सदर इसमास पैसे खात्यातून वजा झालेबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीचा मोबाईल रिसिव्ह करणे बंद केले. त्यामुळे माने यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे तक्रार केली. सायबर पोलीसांनी तात्काळ ऑनलाईन तक्रार नोंदवून तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादींच्या क्रेडीट कार्डद्वारे ॲमेझॉनवर खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनतर तात्काळ ॲमेझॉन कंपनीला इमेल व फोनद्वारे नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन यातील फिर्यादींच्या क्रेडीट कार्डवर केलेली खरेदीची ऑर्डर रद्द करुन फिर्यादीची गेलेली संपुर्ण रक्कम 2,39,998 रुपये फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सहायक फौजदार कुलकर्णी, कर्मचारी कुलकर्णी, हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक पौळ, पोलीस अमंलदार जाधवर, भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सूर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार खांडेकर, शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.