धाराशिव(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन तथा श्री संत ज्ञानेश्वर माऊली ट्रस्टचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त धाराशिव येथे 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर, नागदे निवास येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. हभप नागदे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे गुरूवारी (दि.26) तर शुक्रवारी (दि.27) सायं.7 ते 9 या वेळेत अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन होणार आहे. या सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि.28) स. 7 ते दु. 12.30 या वेळेत धार्मिक विधी , पूजा, होमहवन, औक्षण व तुलाभार कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंडित पुरुषोत्तमाचार्य जोशी (निटूरकर) लातूर व ब्रम्हवृंद या पुजेचे पौरोहित्य करणार आहेत. सायं. 4.30 ते 7. 30 या वेळेत हभप श्री. नागदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम तर पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर देवस्थान कमिटीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज, पंढरपूर येथील देहुकर फडाचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज देहुकर, आळंदी येथील वै. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदिपान महाराज हासेगावकर, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच सोहळ्यात भागीरथी राजेश नागदे हिने आत्मा इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण- शिर्डी येथे झालेल्या सीबीएसई साऊथ झोन स्पर्धेत रौप्य पदक तर मुंबई येथे निता अंबानी स्कूल येथे झालेल्या आयएसएस ज्युडियो राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सायं. 6.30 वा. सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्वाती राजेश नागदे व संत ज्ञानेश्वर माऊली ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.