तुळजापूर (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसात जिल्ह्यात जवळगा येथील सरपंचावर झालेला हल्ला तसेच बारुळ येथे शेतकऱ्यांना दमदाटी अशा घटनांसह चोरीच्या घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार पुत्र मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्या तेरणा युथ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मेघ पाटील यांनी तेरणा युथ फाऊंडेशनच्या वतीने धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन व डीवायएसपी निलेश देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी तुळजापूर तालुक्यातील जवळगा, बारूळ यासह परिसरातील गावांमध्ये पोलीस प्रशासनाने रात्री पेट्रोलिंग करण्याबाबत निवेदन दिले. गेल्या काही दिवसात या परिसरात पवनचक्की कंपनीशी संबंधित लोकांकडून शेतकऱ्यांना मारहाण तसेच दमदाटी करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच या भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून त्यामुळे शेतकरी आणि नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस पेट्रोलिंग करण्याबाबत तेरणा युथ फाऊंडेशनकडून विनंती करण्यात आली आहे.

सदर निवेदनावर सकारात्मक निर्णय घेत लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिल्याची माहिती मेघ पाटील यांनी दिली आहे. मेघ पाटील आणि युथ फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी जवळगा येथे जाऊन गावकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी घडलेल्या घटनांबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पोलिस प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिलेल्या असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे सांगत त्यांना आधार दिला.


 
Top