तुळजापूर (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या अर्थकारणातून हत्या झाल्याने तसाच काहीसा प्रकार धाराशिव जिल्ह्यात सुरू असल्याने याचा आका शोधुन त्यावर कारवाई करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे अमोल जाधव यांनी पत्रकार परिषद घेवुन दिला. या प्रकरणी आपण तक्रार मुख्यमंत्री, महसुल मंञी, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाचे वाहन पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या अकरा कंपन्या कार्यरत आहेत. त्या कंपन्याचे अधिकारी हे डायरेक्ट धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना हप्ता देतात. पवनचक्की उभी करताना शेतजमिनीचा औद्योगिक अकृषक परवाना लागतो. तो परवाना देताना या सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. लाखोंची लाच घेऊन नियमबाह्य परवाना देतात. 6 जिल्ह्यात पवनचक्कीचे ठेकेदार मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन करतात. अशावेळी एखादा अधिकारी गौणखनिजावर कारवाई करायला गेल्यास त्याला निवासी उपजिल्हाधिकारी बोलून घेतात आणि त्याला समजावून सांगतात की, हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे नियमित जिल्हाधिकारी कार्यालयाला गौण खनिजचा पैसा भरत असतात. त्यामुळे पवनचक्की वाल्यांवर कारवाई करून त्यांना त्रास देऊ नका. शोभा जाधव या जिल्ह्याच्या अप्पर जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनवर नियंत्रण मिळवून आहेत. कुठेही कुठल्याही कंपनी किंवा कंपनीचा ठेकेदारांना काहीही अडचण आल्यास निवासी उपजिल्हाधिकारी या डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवून कंपनीवाल्यांना मदत करण्याचे आदेश देतात. त्यामुळे कंपनीचे ठेकेदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंडांना प्रशासनातील एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे ते शेतकऱ्यांना पिळू पिळू घेत आहेत. आणि जो कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवेल त्याला सिनेमाला लाजवेल अशा स्टाईलने दहा-दहा काळ्या स्कॉर्पिओ मध्ये येऊन धमक्या देऊन मारण्याचे काम सुरू आहे.
लातूर येथे असताना त्यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुद्धा सुरू आहे. बीडमध्ये असताना निवडणूकीच्या कामात भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांची निवडणुकीची विभागीय चौकशी सुद्धा सुरू आहे. तरीसुद्धा धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला ना हरकत प्रमाणपत्र देऊन अशा भ्रष्ट मॅडमला आरडीसी बनवले. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. बंदुकीचे लायसन देताना सुद्धा प्रत्येक फाईल मध्ये एक लाख रुपये घेतल्याशिवाय फाईल मंजूर झाल्यावर सुद्धा ऑनलाईन करत नाहीत. निवासी उपजिल्हाधिकारी या पदाला वाहन देय नसताना सुद्धा गौण खनिजमधून खाजगी गाडी लावून त्याच गाडीने धाराशिव येथून सोलापूर आणि लातूर या त्यांच्या स्वतःच्या घरी जातात. असे असंख्य भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन स्रोत त्यांनी शोधले आहेत. धाराशिवचा 'बीड' होऊ नये यासाठी आमच्या जिल्ह्याच्या 'आक्का' असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांनी गैरमार्गाने जमा केलेल्या संपत्तीची फौजदारी गुन्हा दाखल करून खुली चौकशी करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.