धाराशिव (प्रतिनिधी)- मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. 09 डिसेंबर 2024 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानमंडळासह सर्वत्र पडले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज संसदेचे अधिवेशन संपताच मस्साजोग येथे जावून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सात्वन केले. आपण देशमुख कुटुंबियाना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात नेमलेल्या एस.आय.टी.ला निपक्षपातीपणे तपास पुर्ण करणेबाबत निर्देश देण्याची विनंती केली आहे.आज कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशी करुन निर्घुणपणे एखाद्याचे जिवन व कुटुंबास उध्दवस्त करणाऱ्या वृत्तीला कायद्याव्दारे कठोर शिक्षा करावी. भविष्यात अशा प्रकारेचे कृत्ये करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. अशा कठोर उपाययोजना करुन त्याची आंमलबजावणी करावी. अशी मागणी केली आहे.