धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात  अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी  महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रा. डॉ. महेंद्र चंदनशिवे यांनी प्रमुख अतिथी म्हणून ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व शैक्षणिक विचार ' या विषयावर विशेष व्याख्यान दिले. 

विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  प्रमुख वक्ते प्रा. महेंद्र चंदनशिवे, निवृत्त प्राध्यापक, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांनी विशेष व्याख्यानातून मार्गदर्शन केले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि शैक्षणिक विचार' या विषयावर मौलिक विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व असामान्य, अलौकिक, आदर्श होते. संपूर्ण जीवन संघर्षमय होते. 'थॉटस ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ त्यांनी रमाईला अर्पण केला. गोलमेज परिषदेत त्यांनी प्रभावी भुमिका मांडली.  त्यांनी वाचलेले 37000 ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयात होते. कष्टाने, जिद्दीने त्यांनी अनेक पदव्या प्राप्त केल्या. 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ त्यांनी आर्थिक प्रश्नावर लिहिला. विद्वत्तेचा उपयोग त्यांनी समाज व राष्ट्रहितासाठी केला. प्राथमिक, पदवी शिक्षण, उच्च शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी भूमिका त्यांनी मांडले. कामाच्या वेळेची निश्चिती आठ तास त्यांनी केली. पाणी आणि विद्युत शक्तीचे नियोजन केले पाहिजे, अशी भूमिका मांडली.  समता, स्वातंत्र्य आणि बंधुता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केले. सर्व शिक्षण अनुदानित असावे, असे  महत्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मालकीचे शिक्षण करुन सर्वांना शिक्षण दिले पाहिजेत. सर्व वसतीगृह अनुदानित असावीत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्के खर्च शिक्षणावर झाला पाहिजे. प्राध्यापक उत्साही, बहुश्रुत असले पाहिजेत. शिक्षणांतून स्वाभिमान, स्वावलंबन, उद्धार होतो. शिक्षणांतून राष्ट्र बलवान होते, असे प्रतिपादन त्यांनी केले

 विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीनन चरित्रावर मौलिक मार्गदर्शन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात 32 पदव्या प्राप्त केल्या. शिक्षणांतून सामाजिक कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तीमत्व असामान्य, अष्टपैलु होते. तत्त्वज्ञ,  विचारवंत, पत्रकार, लेखक, राजकारणी, समाजसुधारक होते. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे यांनी आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top