धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक दि. 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक आयोगाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) गोपाल चंद आणि पंकजकुमार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले,सर्व निवडणुक निर्णय अधिकारी गणेश पवार (उमरगा), संजय डव्हळे (तुळजापूर), संजय पाटील (उस्मानाबाद), वैशाली पाटील (परंडा) यांची उपस्थिती होती. निवडणुक निरीक्षक पंकजकुमार म्हणाले, मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी घेण्यात येणाऱ्या अभिरुप मतदानाच्या (मॉक पोल) वेळच्या मतदानाची खात्री उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा आपल्या प्रतिनिधी यांनी उपस्थित राहुन करावी.मॉक पोलच्या वेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्यास उमेदवार प्रतिनिधींनी तात्काळ लक्षात आणून द्यावे.
डॉ.ओंम्बासे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेवून मतदान केंद्रावर उमेदवार,उमेदवार प्रतिनिधी व मतदारांना मोबाईल घेवून जाण्यास प्रतिबंध राहणार आहे. कोणत्या मतदान केंद्रावर कोणते ईव्हीएम मशीन जाणार आहे याची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येईल.
बैठकीत माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकरी भोसले म्हणाले, जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 14 लक्ष 4 हजार 12 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 7 लक्ष 38 हजार 628 पुरुष,6 लक्ष 65 हजार 345 स्त्री आणि 39 तृत्तीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 85 वर्षापेक्षा अधिक वयस्क मतदार व दिव्यांग मतदार यांचे विशेष गृहभेटीतून पोस्टल मतपत्रिका मतदान घेण्यात येणार आहे. 132 नियुक्त गृहभेट मतदान पथकातून 3591 पात्र मतदार मतदान करतील. तसेच उमेदवारांनी निवडणूकीत होणारा खर्च विहित नमुन्यात भरुन खर्च संनियंत्रण कक्षाकडे सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.