तुळजापूर (प्रतिनिधी) - स्वातंत्र्यापूर्वी दलित, महिला व गरिबांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात केले जात होते. पूर्वी राणीच्या पोटातून राजा जन्माला जात होता. त्याला शिक्षण नसले तरी किंवा अत्याचारी असला तरी तो राजाच राज्य करायचा. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना मताचा अधिकार दिला आहे. या माध्यमातून राजा निवडण्याची मोठी शक्ती दिली असून आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी मताच्या वापर करून आपणच शासनकर्ती जमात व्हावे यासाठी मोठी शक्ती दिलेली आहे. मात्र मोठ्या घरातील व्यक्ती, हेलिकॉप्टर व आलिशान गाड्यांमध्ये फिरणारी मंडळी गरिबाकडे येऊन त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन जेवण करतात व आपण दोघे भाऊ भाऊ असे म्हणून त्यांचे मत घेऊन निवडून येतात व राज्य करतात. तेच पुन्हा आपल्यावर अन्याय अत्याचार करीत असल्यामुळे आपण आपल्या मताचा आपणच राजा होण्यासाठी आपल्याच समाजातील व्यक्तीला निवडून द्यावे. त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील आजाद समता पार्टीचे उमेदवार भैयासाहेब नागटिळे यांना निवडून द्यावे असे आवाहन आझाद समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांनी दि.15 नोव्हेंबर रोजी केले.
तुळजापूर येथे आजाद समता पार्टीचे उमेदवार भैय्यासाहेब नागटिळे यांच्या प्रचारार्थ श्रीनाथ मंगल कार्यालयात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. चंद्रशेखर आझाद म्हणाले की, पूर्वी खुर्चीवर बसण्यासाठी आपणाला संघर्ष करावा लागत होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसण्याची आपणाला ताकद दिली आहे. मात्र सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम नसल्यामुळे सत्तेचे हकदार असताना आम्ही खुर्चीवर बसत नसून इतरांना मतदान देऊन खुर्चीवर बसवीत असल्याचे सांगत त्यांनी सांगितले. तर डॉ आंबेडकर यांचा स्वाभिमान बाळगा असे आवाहन तरी ते म्हणाले की, आपण डॉ आंबेडकरांना मानत असाल तर डॉ आंबेडकरांनी सांगितलेले ऐकले असे त्यांनी नमूद केले. निवडणुकीमध्ये कोणीच एक व्यक्ती यशस्वी होत नसते त्यामुळे त्यासाठी सर्वांचे काम महत्त्वाचे असते असे सांगत ते म्हणाले की, काम केल्यामुळे सर्वांना इज्जत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय ताकद मिळविण्यासाठी राजनीतिक विचार व ध्येय निश्चित असेल तरच शासनकर्ती जमात बनता येते असे त्यांनी आवर्जून सांगितले. निवडणुकीमध्ये शेळ्या, बकऱ्या जिंकत नसतात तर अनेक योध्दे या निवडणुकीमध्ये उतरत आहेत. मात्र बाबासाहेबांच्या लेकरांना जेवढा दम व समर्पण केलेले आहे तेवढे इतर कोणीही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार मीच आहे असे समजून फक्त दोन तास व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवावी. तसेच एका मतदाराने कमीत कमी 50 मते गोळा करण्यासाठी मेहनत केली तर आपला उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही धर्माच्या, भोजनाच्या, नावावर टोपीवरून व शेतकऱ्यावर अन्याय करण्याचे काम प्रस्थापित पक्षाची मंडळी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करून आपणच राजा बनवायचे व आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करायचे असे त्यांनी सांगितले. मात्र आपल्याच मतावर निवडून आल्यानंतर ही प्रस्थापित मंडळीची मुले आयएसआयपीएस व न्यायाधीश बनवतात. तर तुमची मुले मजुरीचे काम करीत करतात. त्यामुळे मताच्या माध्यमातून सत्ता मिळवून सर्व यशस्वी मार्गाचे कुलूप खोलावे असे आवाहन खा आझाद यांनी केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.