धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील काही राज्यात काँग्रेसप्रणित सरकार होते. केवळ योजनांच्या घोषणा केल्या आणि प्रत्यक्षात जनता आणि राज्याच्या विकासासाठी काहीही न केल्याने जिथे जिथे काँग्रेसची सत्ता होती, तिथे भाजपाचे सरकार आले. 2014 पासून भाजपाशासित स्थिर सरकारमुळे मोठ्या गतीने विकास झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील महायुतीचेच स्थिर सरकार हवे, त्याशिवाय विकासाला चालना मिळणार नाही, असे मत माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी प्रतिष्ठान भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. खंडेराव चौरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. कराड म्हणाले की, 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थिर सरकार होते. त्यावेळी कृषी, सिंचन, वीज, उद्योग, गुंतवणूक, रोजगार आदी क्षेत्रांच्या विकासासाठी भरघोस निधी देवून गतिमान महाराष्ट्रासाठी कामे करण्यात आली. जलयुक्त शिवारमुळे शेतशिवारात पाणी आले. नंतरच्या काळात जनतेने भाजप आणि शिवसेनेला कौल दिला होता. परंतु खर्चीसाठी उध्दव ठाकरे यांनी आपल्या हिंदूत्वाची व्याख्या बदलून काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. अडीच वर्षाच्या काळात केवळ जनहिताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या योजनांना त्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे महायुती सरकार आले. अडीच वर्षापेक्षा कमी काळात त्यांनी पुन्हा प्रगतशील महाराष्ट्र घडविण्यासाठी कामे केली. शेतकऱ्यांना एक रूपयात पीकविमा, जलयुक्त शिवार 3.0, लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना, उद्योजक निर्माण करण्यासाठी केंद्राच्या नवनवीन योजनांची अंमलबजावणी करून महाराष्ट्राचा विकास करून दाखविला. अजून अनेक विकासकामे आणि प्रकल्प मार्गी लागणे बाकी आहे, त्यासाठी राज्यात स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. जनतेने या बाबीचा विचार करून महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपले आशीर्वाद महायुतीला द्यावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.