धाराशिव - कोरोनाकाळात पॅरोलवर सुटलेल्या दोन जन्मठेपेच्या कैद्यांमध्ये झालेल्या वादानंतर एकाचा दुसऱ्याने लोखंडी व्हील पाना डोक्यात घालून खून केला. याप्रकरणी न्यायालयाने त्याला पुन्हा आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कंधार (जिला नांदेड) तालुक्यातील फुलवळ येथील केशव श्रीराम केंद्रे व आळण तालुका परभणी येथील संजय नामदेव गायकवाड हे दोघे छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्या दरम्यान दोघांमध्ये ओळख झाली. दोघेही लॉकडाऊनच्या वेळी कोरोना काळात पॅरोलवर जेलमधून बाहेर आले होते. दि. 27 मार्च 2022 रोजी तुला ड्रायव्हरचे काम देतो असे सांगून बोलावून घेतले व तेथे त्यांच्यात वाद झाला. श्रीराम केंद्रे याने संजय गायकवाड याला लोखंडी व्हील पान्याने मारहाण करत गळा दाबून खून केला. नंतर त्याचा मृतदेह तेर शिवारात तेरणा धरणाजवळ तेर ते ढोकी मार्गावर असलेल्या ऊसाच्या पिकावळ टाकून पुरावा नष्ट केला. संजय यांचा मुलगा आकाश याच्या फिर्यादीवरुन ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी श्रीराम केंद्रे याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी, एम. एस. जोशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला.