धाराशिव (प्रतिनिधी)- जो व्यक्ती सोन्याच्या लंकेपर्यंत गेलेला असताना, त्यावर लाथ मारत आपली निष्ठा विकली नाही. ज्याने आपल्या धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लावला नाही. त्या कैलास पाटील यांना खंबीर साथ द्या, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, धाराशिवच्या जनतेने लोकसभेला आशीर्वाद दिला. जशी साथ तुम्ही ओमराजेंना दिली तीच साथ कैलास पाटील यांना द्यावी. या लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंडा मतदार संघात ही गद्दारी झाली आहे. त्यांना यावेळी हिसका दाखवून द्या असेही आवाहन त्यांनी जनतेला केले.

लोकसभेला आपल्या पक्षाला सात आठ जागा कमी मिळाल्या व देशात सुद्धा अजून वीस पंचवीस ठिकाणी आपले खासदार झाले असते. तर मोदी आता हिमालयात गेले असते असा चिमटा त्यांनी काढला. मला हिंदुत्व सोडल म्हणणाऱ्या भाजपने नवाब मलिक आणि अनेक ठिकाणी काय केले यांचाही जाब ठाकरे यांनी भाजपला विचारला. 

आमचं सरकार आल्यावर आम्ही जे करणार त्याचा वचन नामा दिला आहे. पण महायुती कडून जुमला नामा दिलेला आहे. अडीच वर्ष सत्तेत असताना तुम्हाला या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात आणता आल्या असत्या पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त थापेबाजी करणारी ही मंडळी आहे. आमचं सरकार स्थापन होताच त्यावेळी कशाचाही विचार न करता एका क्षणात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन शब्द मी पाळला होता. मी शब्द पाळणारा आहे व आताही ज्या गोष्टी देणार असं सांगितलंय ते देऊनच दाखवणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. कचऱ्यापेक्षाही कमी किंमत या सरकारने सोयाबीनची केली आहे हे सरकारच कचरा असून त्यांनाच फेकून द्या, आम्ही तुम्हाला हमीभाव पण देऊ व जीवनावश्यक पाच वस्तूचे दर देखील स्थिर ठेवू असे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हमीभाव देऊन दाखवला आहे. त्यामुळे आताही ते देण्यासाठी सरकार हातात द्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कर्मचारी यांची जुनी पेन्शन लागू करु तर आशा व अंगणवाडी सेविकाना वाढीव मानधन देऊ असेही आश्वासन त्यांनी दिले. 

यावेळी ओमराजे म्हणाले, ज्या व्यक्तीन आमदार झाल्यावर निष्ठा जपली संकट काळात पक्षाशी इमान राखल त्या माणसाला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा. मला या मतदार संघात 61 हजार मताधीक्य दिलंय त्यापेक्षा जास्त मतांनी कैलास पाटील यांना आमदार करावे असे आवाहन ओमराजे यांनी केले.

आमदार कैलास पाटील म्हणाले, ज्या पक्षामूळ व जनतेमूळ मला आमदार होता आलं याची जाणीव माझ्या मनात कायम राहणार आहे. कितीही संकटाचा काळ असू द्या मी पक्षाशी व जनतेशी प्रामाणिक राहीन असा शब्द त्यानी यावेळी दिला. आपण आणलेल्या शहरातील रस्ते तसेच कोट्यावधीचा निधी या सरकारने स्थगिती दिल्याने खर्च होऊ शकला नाही. या अशा लोकांनी विकासावर मत मागावे का? असा सवाल यावेळी आमदार कैलास पाटील यांनी विरोधकाना केला.


 
Top