धाराशिव (प्रतिनिधी)- जगदगुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी गो ध्वज स्थापना करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील दुधाळवाडी येथील गोशाळेत देखील महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा गोसेवक वैद्य नवनाथ दुधाळ यांनी गो ध्वजाची स्थापना करुन गोसंवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी बोलताना वैद्य नवनाथ दुधाळ यांनी, गो ध्वज स्थापनेमागील उद्देश सांगितला. ते म्हणाले की, 22 सप्टेंबर 2024 रोजी शंकराचार्य महाराजांनी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी आयोध्या धाम येथे रामकोटाची परिक्रमा करुन या यात्रेची सुरुवात केली. या ऐतिहासिक भारत यात्रेला भारतातील सर्व राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. गोमाता वाचविण्यासाठी देशातील गोहत्या तात्काळ थांबली पाहिजे. पशुच्या श्रेणीमधून गोवंशाच्या श्रेणीत घेण्यात यावे, त्याचबरोबर गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे. यात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, त्याचप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 48 गोसांसद यांनी या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. प्रधानमंत्र्यांना देखील या मागणीसाठी आमचा सदैव पाठींबा राहील, असेही ते म्हणाले. सर्व बांधवांनी गायीचा मुद्दा पुढे आणावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्व जाती-धर्मातील लोकांनी घेऊन गोवंशाचे संवर्धन करावे. जगदगुरु अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोसांसद स्थापना केली असून राज्य प्रभारी या नात्याने आपण स्वतः महाराष्ट्रात गोध्वज स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोसांसद पाठविलेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील गोशाळांमध्ये गो ध्वज स्थापन करण्यात येत असून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही दुधाळ यांनी केले. यावेळी गो माता राष्ट्रमाता, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा गोसेवकांनी दिल्या.