धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी तीन वाजता संपली आहे. जिल्ह्यातील चारही मतदार संघात बंडोखोऱ्यांना अर्ज मागे घेण्यास युती आणि आघाडीला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासूनच चारही मतदार संघातील कोणते उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. जरांगे पाटील यांनी आज सकाळीच निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मतदार संघातील उमेदवारांनी सकाळपासूनच अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली होती. तीन वाजेपर्यंत चारही मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आहेत.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजी कापसे, सुरज साळुंखे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे मकरंद राजे निंबाळकर, सुधीर पाटील, अपक्ष उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपापले अर्ज तीन वाजण्यापूर्वी मागे घेतले. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे कैलास पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यातच थेट लढत होणार आहे. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ही माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह मुकुंद डोंगरे या बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. काँग्रेस हायकमांडकडून ठोस आश्वासन चव्हाण यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे, जीवनराव गोरे, संजय निंबाळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपाचे ॲड. व्यंकट गुंड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक असणारे सज्जनराव साळुंके, महंत तुकोजी बुवा यांनी आपले अर्ज परत घेतले. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेसचे ॲड. धीरज पाटील, वंचितच्या डॉ. स्नेहा सोनकाटे व समाजावादी पार्टीचे देवानंद रोचकरी अशी लढ होईल.
तर भूम-परंडा-वाशी मतदासंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर याच मतदारसंघात जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक असणारे प्रशांत चेडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे विरूध्द पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या लढत होणार आहे.
तर उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले विरूध्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रविण स्वामी यांच्यात प्रमुख सामना होणार आहे. तर अपक्ष म्हणून सातलिंग स्वामी यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे.