धाराशिव (प्रतिनिधी) - महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी मल्हार पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील आरणी, टाकळी (ढोकी), भंडारवाडी, दाऊतपूर येथे कॉर्नर बैठका घेतल्या. तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
युवा नेते मल्हार पाटील म्हणाले की, धाराशिव तालुक्यातील आरणी, टाकळी, भंडारवाडी, दाऊतपूर व परिसरातील विविध गावांतील बहुतांश नागरिक आपल्या हक्काची माणसे असून पहिल्यापासून माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर जिवापाड प्रेम करणारी आहेत. या गावांनी दिलेली साथ पाटील कुटुंबीय कधीही विसरू शकत नाहीत. गेल्या पाच वर्षांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गावांच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील महत्वाचे विषय मार्गी लावले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार हमी कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार पाटील यांच्या विकासाच्या मुद्यावर प्रभावित होऊन भंडारवाडी येथील काँग्रेसचे ऋषी माळी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. याबद्दल त्यांचे स्वागत केले. तसेच राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार आहे. आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी आपल्या हक्काच्या या गावांतून मोठे मताधिक्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत जाऊन प्रत्येक मतदान आपल्या हक्काच्या आमदार पाटील यांना म्हणजेच कमळाला कसे होईल? यासाठी कष्ट घ्यावेत, असे आवाहन पाटील यांनी केले.