धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी ढोकी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका करत, बेरोजगारी, परीक्षा फॉर्मच्या शुल्कवाढ, पेपरफुटीचे प्रकार आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल करून युती सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा फी वाढ व पेपरफुटीमुळे तरूण अस्वस्थ झाल्याची टिका आमदार कैलास पाटील यांनी केली.

सभेच्या सुरुवातीला बोलताना पाटील म्हणाले, “आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी परीक्षा शुल्क 100 रुपये आहे, पण आपल्या राज्यात तलाठी परीक्षेसाठी शुल्क 1,000 रुपये आहे. यावर मुख्यमंत्री म्हणतात की विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य यावे म्हणून शुल्क वाढवली. मात्र, हेच विद्यार्थी 20 तारखेला त्यांना गांभीर्य काय असते ते दाखवून देतील.“


पेपरफुटीवर गंभीर आरोप


पाटील यांनी गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. “पोलिस भरती, तलाठी भरती यासह प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटले आहेत. मात्र, आजपर्यंत एकही आरोपी सापडलेला नाही, कारण हेच लोक या भ्रष्टाचारात सामील आहेत,“ असा गंभीर आरोप त्यांनी केला. पेपरफुटीच्या चौकशीची मागणी वारंवार होऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.


आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

पाटील यांनी मराठा, धनगर आणि इतर समाजांच्या आरक्षण प्रश्नांवरून सरकारला लक्ष्य केले. “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटले, पण सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नालाही नेहमीच चालढकल केली गेली आहे,“ असे सांगत त्यांनी या प्रश्नांवरून राज्य सरकारवर प्रखर टीका केली.


राजकीय टीका आणि मतदारांना सल्ला

कैलास पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवरही निशाणा साधला. “यांना चिन्ह भाजपने दिले आहे, कारण फक्त 'कमळ' चिन्हावर मतदान मिळणार नाही. त्यामुळे सरकारने फोडाफोडीचे राजकारण केले आहे,“ असा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत, “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावणारे, जाती-जातीत भांडण लावणारे, धर्माधर्मात फूट पाडणारे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते,“ असे विधान केले.


मशाल चिन्हासाठी मतदानाचे आवाहन

सभेच्या शेवटी पाटील यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले, “आपल्या मशाल चिन्हाला दोन नंबरवरचे बटण दाबून, पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी द्या. मी तुमच्या प्रत्येक लढाईत रस्त्यावर तुमच्यासोबत असेन.“कैलास पाटील यांच्या या सभेत त्यांनी विविध मुद्दे उचलून धरत विद्यमान सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले. मतदारांनी त्यांच्या 'मशाल' चिन्हावर मतदान करून महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत त्यांनी आपला प्रचार अधिक तीव्र केला.


 
Top