धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या सत्तेवर दोन व्यापारी बसले असून राज्यात त्यांचे तीन छोटे व्यापारी आहेत. यांच्या व्यापारी धोरणामूळ जनतेला भिकारी व्हायची वेळ येत असल्याचा घणाघात आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. खानापूर (ता. धाराशिव ) येथे आयोजित सभेत उमेदवार आ. कैलास पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबर टीका करत त्यांचे धोरण शेतकरी, पशुपालक, आणि सर्वसामान्य जनतेला कसे हानीकारक ठरले आहे, हे तपशीलवार सांगितले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देशातील दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. पूर्वी जनावरांच्या पेंड पोते अकराशे रुपयाला होते तेव्हा दुधाला दर 35 रुपयापर्यंत मिळत होता. मात्र आता, पेंडची किंमत 1800 रुपयांपर्यंत पोहोचली असतानाही दुधाचे दर फक्त 22 ते 25 रुपयावर आहेत. ही गंभीर समस्या परदेशातून दुधाची भुकटी आयात केल्यामुळे निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून बाहेरील व्यापाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत.
दुधाला अनुदान देण्याच्या सरकारच्या घोषणांवरही त्यांनी ताशेरे ओढले. अनुदान देण्याचे केवळ मोठे बोल करून केंद्र सरकारने एक रुपयासुद्धा दिला नाही. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आपले शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संकटात असताना, सरकार केवळ घोषणा करत बसले आहे,असे ते म्हणाले.
सोयाबीनच्या दरावरील घसरण हाही एक गंभीर प्रश्न असून त्यावरही आ. पाटील यांनी सरकारला दोष दिला. सोयाबीनचे आधारभूत मूल्य रु. 4900 निश्चित केले आहे, पण शेतकऱ्यांना केवळ रु. 3800 चा दर मिळत आहे. सरकारने हमीभाव केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र ती केंद्रे उशिरा सुरू झाली. शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा संपूर्ण मोबदला मिळायला हवा, पण सरकार व्यापाऱ्यांच्या फायद्याची तजवीज करत आहे. व्यापारी मात्र सोयाबीन खरेदीमध्ये हात मारत आहेत, तर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
आ. कैलास पाटील यांनी अधिक आक्रमक भाषेत सांगितले, ज्या देशाचे राजे व्यापारी असतात, त्या देशातील प्रजा भिकारी बनते, अशी परिस्थिती भारतात तयार होत आहे. गुजरातमधील दोन व्यापारी भारताच्या अर्थकारणावर पूर्णपणे नियंत्रण घेत आहेत, तर महाराष्ट्रात तीन इंजिनयुक्त मिंधे आपल्या जनतेला गरीब बनवत आहेत. हे सरकार फक्त मूठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच काम करत आहे आणि शेतकऱ्यांची, गरीबांची फसवणूक करीत आहे.
यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले की, हे अपयशी सरकार आता सत्तेवरून हकालून लावा. महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा. आपण आपल्या अधिकाराचा वापर करून ही अन्यायाची सत्ता उलथून लावू शकता. मशाली समोरील बटन दाबा आणि आपल्या न्यायाच्या लढ्यात महाविकास आघाडीला पाठिंबा द्या,असे करत त्यांनी मतदारांना बदलाची हाक दिली.