धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी 3965 मताधिक्याने विजय मिळवला आहे. राज्यभर महायुतीची लाट असतानाही, स्वामी यांनी तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे  उमेदवार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव करून महत्त्वाचा विजय साधला.  


काँग्रेसचा महत्त्वाचा हातभार  या विजयात काँग्रेसचे योगदान निर्णायक ठरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते प्रकाश आष्टे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार केला. आष्टे यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आघाडीधर्म पाळला आणि प्रवीण स्वामी यांना विजयाकडे नेले.  

प्रकाश आष्टे यांनी काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून अचलबेट देवस्थानसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून दिले व त्याचे सध्या काम सुरू आहे याचा फायदा देखील स्वामी यांना झाला. त्यांच्या कन्या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक आहेत. बाप-लेकीने उमरगा मतदारसंघात स्वामी यांच्या प्रचारासाठी जोमदार प्रयत्न केले.प्रदेश सचिव दिलीप भालेराव, युवक काँग्रेस राज्य समन्वयक महेश देशमुख तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे यांनी काँग्रेस पक्षाची कमान संभाळली आणि मतदारांशी संवाद साधला.  


प्रचारातील परिश्रमांचा यशस्वी परिपाक

प्रवीण स्वामी यांच्या विजयामध्ये प्रकाश आष्टे यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मानले जात आहे. आष्टे यांच्या नेतृत्वाखालील प्रचार यंत्रणेने मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रभाव प्रस्थापित केला.  महायुतीचा जोर ओसरवत, उमरगा मतदारसंघात महाविकास आघाडीचा हा विजय शिवसेना शिंदे गटासाठी धक्कादायक ठरला आहे.

 
Top