धाराशिव (प्रतिनिधी)-  कळंब  महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात वाठवडा, ता. कळंब येथे झालेल्या कॉर्नर सभेत मतदारांना उद्देशून जोरदार आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असल्याचे म्हटले आणि विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणत महायुती सरकारवर तीव्र टीका केली.

आमदार पाटील म्हणाले, पहिले अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, परंतु त्यातील दोन वर्षे कोविडच्या संकटात गेली. त्यामुळे आम्हाला फक्त सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्या कालावधीत देखील आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर सत्तेवर आलेले महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवून केवळ राजकीय फायद्यासाठी धोरणे आखली आहेत.

महाविकास आघाडीच्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत, आमदार पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने जेव्हा सत्तेत होते, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलली होती. कोविड काळात देखील आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली आहे. यामुळे आज शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

आमदार कैलास पाटील यांच्या या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित त्यांच्या या भाषणाने मतदारसंघात चर्चेला नवीन दिशा दिली आहे. यावेळी रामलिंग आव्हाड, अण्णासाहेब तनमोर, बिभीषण देशमुख, भारत इरपतगिरे, हनुमंत साळुंखे, बालाजी आल्टे, नारायण गवळी, काका राऊत, विजय इंगळे, वकील पठाण, अमृत टेकाळे, आकाश पवार, सल्लाउद्दीन बेग , फकीर सय्यद, संदेश पवार, बाप्पा येवनकर, खंडू आल्टे, अमित आल्टे, राजाभाऊ आल्टे आदी उपस्थित होते.

 
Top