धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हयातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी आणि मोठ्या संख्येने मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जागृतीचा एक भाग म्हणून आज 14 नोव्हेबर रोजी सकाळी 8 वाजता “ रन फॉर व्होट” रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथून रॅलीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे व पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे सहभागी होते.
“रन फॉर व्होट” रॅलीत धाराशिव शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या 950 विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी, युवक-युवती व विविध शासकीय अधिकारी - कर्मचारी यांचा मतदान जनजागृती रॅलीत सहभाग होता. रॅलीत सहभागी पारंपरिक संबळ, ढोल व ताशा वाद्याच्या आवाजाने रॅलीत उत्साह निर्माण केला. शिक्षक पाटील यांच्या हसमुखराय या बोलक्या बाहुल्याने देखील मतदान करण्याचा संदेश दिला.