तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट हेच आपले ध्येय आहे. जगदंबेच्या आशीर्वादाने मागील पाच वर्षांत तुळजापूर मतदारसंघाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर नोंदविता आले. जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन तुळजापूर शहरात विकसित करण्यासाठी दोन हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीकडे आपले विशेष लक्ष आहे. तुळजापूरचा कायापालट होत आहे. जिल्ह्याचाही सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि सोबत महत्वपूर्ण असल्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. 

तुळजापूर शहरात महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी भव्य आशीर्वाद यात्रा पार पडली. यावेळी ते बोलत होते. रविवारी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करून आशीर्वाद यात्रेस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भवानी रोड, महाद्वार रोड, कमान वेस गल्ली या प्रमुख मार्गावरून तुळजाभवानी मंदिरापर्यंत ही आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आशिर्वाद यात्रेचे भव्य सभेत रूपांतर झाले.

तुळजाभवानी मंदिरासह परिसरात विकासकामे करून, पर्यटक व भाविकांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्यासाठी आवश्यक ती विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना आणखी पर्यायी व्यवसाय करून आपले उत्पन्न दुपटीने वाढविता येणार आहे. तुळजापूरकरांना विश्वासात घेवूनच सर्व विकासकामे करायचे आहेत. ठाकरे सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी एक रूपयाही दिला नाही, अडीच वर्षे काम थांबले होते. त्यासाठी आपण परिवहन मंत्र्यांवर हक्कभंग आणला. शेवटी साडेचारशे कोटी रूपयांचा निधी महायुती सरकारनेच उपलब्ध करून दिला आणि रेल्वेमार्गाचे काम चालू झाले. केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेसाठी तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास आराखडा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवावा, यासाठी आपण पाठपुरावा केला होता. मात्र ठाकरे सरकारने ऐकले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी महायुती सरकारनेच दिली. मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले, लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रूपये लाभाची योजना सुरू केली. त्यामुळे विरोधकांना अडीच वर्षात महायुती सरकारने काय केले, हे विचारण्याचा नैतीक अधिकार राहिला नाही. नळदुर्गला बसवसृष्टी उभारली जात आहे. तुळजापुरात अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक, बौध्द विहार, शादीखान्याचे भूमिपूजन केले. हा फक्त विकासाचा ट्रेलर आहे. विकासाचा पिक्चर अजून बाकी आहे आणि त्यासाठी सर्वांची साथ हवी असल्याचे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

 
Top