तुळजापूर (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय पातळी वरील इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनच्या डाळ वर्गीय पीक विकास परिषदेच्या चेअरमनपदी नारायण नन्नवरे यांची निवड करण्यात आली. ग्रँट थोर्टन प्रभादेवी मुंबई या ठिकाणी 25 नोव्हेंबर रोजी परिषदेच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

या बैठकीस कॅनडा येथील प्रतिनिधी स्कॉट मॅत्थिस तसेच महाराष्ट्रातील स्मार्ट चे नोडल अधिकारी चंद्रकांत माळी, विनायक पाटील, शरद म्हेत्रे ,सीईओ डॉ शुभ्रा देशपांडे , रावसाहेब बेंद्रे, चंचल पाल्हाल, सुभजीत बॅनर्जी ,श्रेया झा यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते परिषदेच्या चेअरमनपदी नारायण नन्नवरे तसेच सचिवपदी विनायक पाटील यांची निवड करण्यात आली. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्य व महाराष्ट्र शासनाच्या (स्मार्ट ) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर या परिषदेचे कार्य सुरू असणार आहे. 31 जुलै 2024  रोजी इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनच्या नावाने देशातील पहिल्या डाळ वर्गीय पीक विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमध्ये अशा पीक विकास परिषदा पूर्वीपासून कार्यरत आहेत पण इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशन ही भारतातील डाळवर्गीय पिकातील पहिली पीक विकास परिषद आहे. या परिषदेच्या माध्यमातून डाळ वर्गीय पीक उत्पादक शेतकरी, खरेदीदार, कृषी निविष्ठा उद्योग, साठवण उद्योग, वाहतूक उद्योग, प्रक्रिया उद्योग इत्यादींसह डाळ वर्गीय पीक मूल्य साखळीतील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून डाळ वर्गीय पीक  उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केले जाणार आहे.

 
Top