धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा व भूम-परंडा या चारही विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत प्रत्यक्ष किती टक्के मतदान झाले यांची माहिती मिळेल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. काही मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची मतदानासाठी मोठी रांग लागल्याची दिसून आले. रात्री सात वाजेपर्यंत मतदारांनी उस्मानाबाद मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात चुरशीचा सामना पहायला मिळाला. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे विरूध्द शिवसेना उबाठा गटाचे कैलास घाडगे पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. तर परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत विरूध्द शरद पवार राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील विरूध्द काँग्रेसचे ॲड. धिरज पाटील यांच्या प्रमुख लढत झाली आहे. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी व वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी पण आपले नशीब आजमावले आहे. तर उमरगा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्यावतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरूध्द महाविकास आघाडीचे प्रविण स्वामी यांच्यात लढत आहे.
सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत चारही विधानसभा मतदारसंघात सरासरी 31.75 टक्के मतदान झाले आहे. तर दुपारी 3 वाजेपर्यंत चारही मतदारसंघात सरासरी 45.81 टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत चारही विधानसभा मतदारसंघात सरासरी 58.59 टक्के मतदान झाले आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 56.22 टक्के मतदान झाले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघा 57.70 टक्के मतदान झाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 62.26 टक्के मतदान झाले आहे. तर उमरगा विधानसभा मतदारसंघात 57.88 टक्के मतदान झाले आहे. तर चारही विधानसभा मतदारसंघात सरासरी 65 ते 70 टक्के मतदान होण्याच्या अंदाज आहे.
निवडणुकीतील वैशिष्टये
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे काही मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. तर जेष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी इतरांच्या मदतीने येताना दिसून आले. या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. विद्यमान पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मुगाव ता. परंडा तर राहुल मोटे यांनी गिरवली, ता. भूम येथे मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे तर काँग्रेसचे अँड धिरज पाटील व समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी यांनी तुळजापूर येथे मतदानाचा हक्क बजावला. तर उमरगा विधानसभा मतदारसंघातील आमदार ज्ञानराज चौगुले व प्रविण स्वामी यांनी उमरगा शहरात मतदानांचा हक्क बजावला. उस्मानाबाद विधानसभा मतदासंघातील अजित पिंगळे यांनी कळंब तालुक्यातील पाथर्डी येथे तर कैलास पाटील यांनी सारोळा ता. धाराशिव येथे मतदानांचा हक्क बजावला.