धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांकडून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री इत्यादींवर पूर्ण प्रतिबंध करण्याकरिता कठोर कारवाई करण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर रोजी निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क धाराशिव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी कळंब, भूम, तुळजापूर, उमरगा या चार तालुक्यातील हातभट्टी दारू नष्ट करून आरोपींना अटक केली आहे.
या कारवायामध्ये एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एकूण 80 गुन्हयांची नोंद करुन, 78 आरोपींना अटक केली आहे. एकूण 4 वाहनांसह रुपये 17 लाख 32 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.