धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता नॅचरल शुगरचा सहावा गळीत हंगाम 202425 चा बॉयलर अग्निप्रदम समारंभ रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे संचालक अँड.शरद गुंड या उभयतांच्या शुभहस्ते व रुपामाता परिवाराचे मार्गदर्शक जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) व हभप. बाबुराव पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 31 ऑक्टोबर रोजी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना संस्थापक अँड. गुंड यांनी कारखाना चांगल्या पद्धतीने प्रगती करत असून या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी सक्षम ऊस वाहतूक यंत्रणा उभी केली असून कारखाना गाळपास सज्ज असल्याचे सांगितले. तसेच ऊस उत्पादकांनी आपल्या या हक्काच्या कारखान्यात ऊस देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी सभासद बंधू, कारखाने सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व कार्यकर्ते उपस्थित होते.