भूम (प्रतिनिधी)- शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील असलेल्या कुटुंबातील सदस्याला घरकुल मंजूर झाल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी. या मागणीसाठी आरपीआय आदिवासी पारधी समाज तालुका अध्यक्ष भारत बापू काळे यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी पासून पंचायत समिती समोर आरपीआय आदिवासी पारधी समाज तालुका अध्यक्ष भारत बापू काळे व त्यांच्या समर्थकांनी रामेश्वर येथील सेवानिवृत्त कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील असलेल्या कुटुंबातील सदस्याला बेकायदेशीरपणे ग्रामसेवकाने घरकुल मंजूर केले आहे. यामुळे खरा लाभधारक वंचित राहिला आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व संबंधितावर कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी उपोषणार्थींनी यापूर्वी केली होती. परंतु या प्रकरणात कसलीही चौकशी झाली नाही. पंचायत समिती प्रशासन बेकायदेशीर घरकुल मंजूर करणाऱ्याच्या पाठीशी असल्याचे यावरून दिसून येत आहे. या आंदोलनातील उपोषणार्थीच्या मागणीला अनुसरून आरपीआयचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवतराव शिंदे, तालुका अध्यक्ष अमोल शिंदे हे देखील प्रशासनाकडे या प्रकरणाच्या चौकशी संबंधित पाठपुरावा करत आहेत.