धाराशिव (प्रतिनिधी) - जागतिक तिरंदाजी महासंघाच्या अधिपत्याखाली चायनीज तैपेई येथे घेण्यात आलेल्या आशियाई आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा रिकर्व्ह धनुर्धर रैयान सिद्दिकी याने सुवर्ण पदक पटकाविले आहे. आशियाई आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणारा मराठवाड्यातील पहिला धनुर्धर ठरला आहे.
तैवान चीन येथे 26 सप्टेंबर पासून चालू असलेल्या आशियाई आर्चरी स्पर्धेत सोमवारी ज्युनियर रिकर्व्ह मुलांच्या अंतिम सामन्यात यजमान चायनीज तैपेई संघास नमवत भारतीय संघाने विजेतेपद पटकाविले आहे. देशास सुवर्णपदक पटकावून देण्यास धाराशिवच्या रैयानची कामगिरी महत्वपूर्ण ठरली आहे.
आज तागायत राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील आर्चरी स्पर्धेत अनेक पदके पटकावून दिले आहेत. विशेष ऑगस्ट महिन्यात कोरिया येथे झालेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी केंद्र शासनाकडून रैयानला पाठवण्यात आले होते.
वडील तोफिक सिद्दिकी यांचे नेहमीच पाठबळ असणाऱ्या रैयानने धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कोच नितीन जामगे यांच्याकडे आर्चरीचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय आर्चरी कोच रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली रिकर्व्ह प्रशिक्षण घेत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रैयानने सुवर्णपदकास गवसणी घालत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे. त्याच्या कामगिरीर बद्दल धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, अविनाश गडदे, अतुल अजमेर, प्रवीण गडदे, अभय वाघोलीकर आदींसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी रैयानचे अभिनंदन केले आहे.