धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील वर्ग एकच्या जमिनी वर्ग दोन मध्ये करण्याचा तुघलकी निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. खरेतर अशा प्रकारचा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते. मात्र, येथील राजकीय नेत्यांच्या वादामुळे व जिल्हा प्रशासनाने देखील या वादाचा फायदा घेत वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 मध्ये करुन जिल्ह्यातील जनतेला लढविण्याचे काम केले गेले. त्यामुळे जमीन मालक व प्लॉट धारक यांच्यावर अन्याय झाल्याने त्यांना न्याय देण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. या समितीचे नेतृत्व करण्याची मला संधी दिली. मात्र सर्व जनतेने तसेच सर्व पत्रकारांनी देखील बातम्यांच्या माध्यमातून हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळेच आपला हा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे वर्ग 2 मधील जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय अखेर शासनाला घ्यावाच लागला असल्याचे प्रतिपादन शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी दि.10 ऑक्टोबर रोजी केले. दरम्यान, मदतमास, वतन जमिनी, देवस्थान हा प्रश्न सरकारने अद्यापपर्यंत मार्गी लावला नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर निर्णय घेऊन तो प्रश्न सोडवावा. अन्यथा न्यायासाठी चळवळ काय असते ? याचे धाराशीव जिल्हा हे चळवळीचे केंद्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

धाराशिव शहरातील दर्गाह येथील सभागृहात शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्यावतीने शेतकरी बचाव कृती समितीतील सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्यासह सर्व समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते विश्वास शिंदे, समितीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ बागल, मसूद शेख, सुभाष पवार, उमेशराजे निंबाळकर, अभिजीत गिरी, मुकुंद घुले, खलील सय्यद, नंदकुमार शेटे, ॲड परवेज काजी, शुकूर कुरेशी, इलियास मुजावर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने व मनमानीपणे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रातोरात वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 मध्ये करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे जिल्हा वाशियांचे खूप मोठे नुकसान झाले. हा जिल्हा कायम दुष्काळ, मागास म्हणून कायम अन्याय झाला आहे. तर नव्याने केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कृती समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये माझ्यावर विश्वास टाकून माझी निवड केली तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या सोबत सत्तर प्रयत्न करून यशस्वी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.  विशेष म्हणजे शहरांमधील रस्ते व नाल्या उद्ध्वस्त झाल्या असून रस्त्यावर पूर्ण चिखल साचल्याने संपूर्ण शहर चिखलमय झाले आहे. मात्र यासाठी देखील जनता रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे नगर प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शहरवासियांना सोबत घेऊन या कृती समितीच्या माध्यमातून तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तर विश्वास शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षापासून हा लढा सुरू असून यासाठी उपोषण, धरणे आंदोलन, सरकारला सदबुद्धी मिळावी यासाठी तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर जागरण गोंधळ आंदोलन, जिल्हाधिकारी, आयुक्त, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या वारंवार भेटी घेतल्या.   यासाठी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी आपली ताकद वापरल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या लढ्यात सातत्य ठेवण्याचा काम धनंजय शिंगाडे यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक मसूद शेख यांनी तर उपस्थितांचे आभार खलील सय्यद यांनी मानले.  या कार्यक्रमास माजी नगरसेवक उदय निंबाळकर, विशाल शिंगाडे, सुधीर मोटे, इलियास पिरजादे, डॉ वसीम काजी, रावसाहेब शिंगाडे आदींसह सर्व समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top