धाराशिव (प्रतिनिधी)- मांजरा परिवाराचा अविभाज्य घटक असलेला तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्यामार्फत ऊस विकास योजनेंतर्गत कार्यक्षेत्रात ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 मध्ये प्रमाणीत ऊस रोपे लागवडीसाठी योजना राबविण्यात येत आहे. त्यास शेतकऱ्यांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत आहे.
तुळजापूर तालुक्यातील मांजरा कारखान्याच्या व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रात व परिसरातील शेतकऱ्यांच्या जिवनात हरितक्रांती येऊन त्यांचा आर्थिकस्तर सुधारण्याचा सार्थ हेतू विचारात घेऊन कारखान्यामार्फत प्रभावीपणे ऊस विकास योजना राबविण्यात येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना आधुनिक व सुधारित पध्दतीने ऊस शेतीची माहिती होण्यासाठी 16 ते 19 ऑगस्ट 2024 दरम्यान विभागवार शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. आधुनिक व सुधारित पद्धतीने ऊस शेती करणे काळाची गरज असल्याने मांजरा कारखान्यामार्फत ऊस विकास योजनेंतर्गत कार्यक्षेत्रातील 40 किमी अंतरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणीत एक डोळा ऊस रोपे आक्टोंबर व नोव्हेंबर 2024 मध्ये लागवडीसाठी वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रमाणीत एम. एस 10001, को-86032, को व्हिएसआय 18121, फुले 15012 व फुले 13007 अशा विविध जातीची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी केले आहे.