धाराशिव (प्रतिनिधी)- रामपुर तालुका उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई अंतर्गत “चला सावली पेरूया“ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या उमरगा तालुक्याचे शिलदार डॉ. ज्योती सातपुते व डॉ. शीतल पाटील या उपस्थित होत्या. डॉ. सातपुते व डॉ. पाटील  मंजुषा चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना बीजसंकलन करून बियांपासून रोपे तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करूनही दाखवले. विद्यार्थ्यांनीही खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

प्रत्येक विद्यार्थ्याला दोन बिया व एक पिशवी देण्यात आली. यामध्ये अर्जुन व कडुनिंबाच्या बिया देण्यात आल्या. आपल्या परिसरातील देसी झाडाचे महत्त्व सांगण्यात आले. या उपक्रमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना बिया रुजवण्याचा संस्कार व संवर्धन होण्याकरिता सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य होत आहे. पुढच्या पिढीला निसर्ग संस्कार देण्याइतका दुसरा आनंद नाही. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक महादेव शिंदे यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विकास स्वामी यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद धर्मराज भोसले, बालाजी गायकवाड, तानाजी कांबळे, स्नेहा वेल्हाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top